Ad will apear here
Next
‘...परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो’


गीतेतील कृष्णापेक्षा माउलींचा कृष्ण अधिकच मनोज्ञ आहे... अर्जुनाच्या प्रश्नांवर उचंबळून येणारा, त्या सगळ्या प्रश्नांमुळे निर्माण होणारी आंदोलनं न सांगता जाणणारा... सख्या अर्जुनाच्या मनोरथाचे लगाम कधी खेचत... कधी सैल सोडत योग्य दिशेने नेणारा... त्यासाठी भरभरून बोलणारा...

तेराव्या अध्यायात असंच काही घडतंय... तेराव्या अध्यायात गीतेचे श्लोक अवघे ३४... आणि त्यावरचं माउलींच्या कृष्णाचं भाष्य ११७० ओव्यांचं... या अध्यायाचं नावच ‘क्षेत्रक्षेत्रज्ञयोग!’ क्षेत्र म्हणजे काय, हे क्षेत्र जाणणारा क्षेत्रज्ञ कोण? ब्रह्म म्हणजे काय? माया कशी निर्माण होते? ज्ञान म्हणजे काय? अज्ञान म्हणजे काय? ज्ञेय म्हणजे काय? एक एक विषय इथे उलगडला जातोय...

पै बाळ जे जेवविजे । ते घासु विसा ठायी कीजे । 
तैसे एकचि हे चातुर्व्याजे । कथिले आम्ही ।। 

माउलींचा कृष्ण म्हणतोय, एखाद्या छोट्या बाळाला जेवू घालायचं, तर एका मोठ्या घासाचे वीस छोटे-छोटे घास करावे लागतात ना? ते अन्न त्याला नीट पचावं याकरता त्याच्या क्षमतेप्रमाणे भरवावं लागतं ना? तसं अर्जुना... या विषयाचा आवाका मोठा, व्याप्ती मोठी आणि खोलीही अथांग... ती सांगताना ‘चातुर्व्याजे’ सांगितलीय.... ब्रह्म म्हणजे काय हे सांगताना क्षेत्र, क्षेत्रज्ञ, अज्ञान आणि मग ज्ञेय असे चार छोटे भाग केलेत. 

लहान बाळाला लहान घास देत भरवावं, तसं सख्या अर्जुनासाठी कृष्ण विषयाचा विस्तार करतोय... पुन्हा पुन्हा सांगतोय...
‘परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो...’ असं म्हणून कृष्ण अर्जुनाला आता ‘ज्ञेय’ म्हणजे काय हे ऐक... असं सांगतोय. जे केवळ ज्ञानानेच प्राप्त होतं आणि जे प्राप्त केल्यावर प्राप्त करण्यासारखं दुसरं काही शिल्लक उरतच नाही, असे ‘ब्रह्म’ म्हणजे ज्ञेय, असं कृष्ण म्हणतोय.

पण कसं जाणायचं हे ज्ञेय? कसं वर्णन करायचं या ब्रह्माचं? ज्याला रूप नाही, वर्ण नाही, मर्यादा नाही, मिती नाही, आकार नाही, आदि-अंत नाही ते कसं सांगायचं? हे सगळं पाहून बोलीच मुकी झाली, अशी स्थिती...

शब्दही जिथे निःशब्द होतात, व्यावहारिक ज्ञानाचा प्रांत जिथे संपतो, इंद्रियगोचर जाणीव संपते, असे अतींद्रिय काही सांगण्यासाठी माउली आता ‘अन्वय’ आणि ‘व्यतिरेक’ यांच्या आधारे सुंदर दृष्टांत आपल्यासमोर ठेवतात. परब्रह्म जाणण्याकरिता प्रथम ‘व्यतिरेक’ सांगतात... म्हणजे, दिसणारं जग हे परब्रह्मापेक्षा वेगळं आहे, असं समजून, ते पाहायला शिकवतात.

जैसी भांडघटशरावी । तदाकारे असे पृथ्वी ।
तैसे सर्व होऊनिया सर्वी । असे जे वस्तू ।।

मातीचं भांडं केलं, घट केला, वेळणी केली. कितीही लहानमोठे आकार केले, तरी त्यात असते मातीच! तसं वेगवेगळ्या आकारात, रंग-रूपात हे जग दिसत असलं, तरी ते एकमेव ब्रह्मापासून निर्माण झालं आहे.

लाकडापासून अनेक खेळणी केली. हत्ती, मोर, हरीण... अशी! पाहणाऱ्याला लाकडाच्या ठिकाणी तो-तो प्राणीच दिसतो. जणू लाकूडपण नष्ट होते आणि लाकडापेक्षा वेगळीच वस्तू प्रत्ययाला येते. त्याप्रमाणे, पृथक-पृथक आकार, रंग-रूप, गुण, मिती, मर्यादा यांनी नटलेल्या या जगात आपल्याला गवताच्या काडीपासून महाप्रचंड पर्वतापर्यंत, सजीव-निर्जीव सृष्टीचे विविधांगी दर्शन घडते. असे असले, तरी या सर्वांचे आधारभूत एकमेव ‘ब्रह्म’ आहे.

आता, हीच संकल्पना माउली ‘अन्वया’च्या आधारे समजावून सांगतात. दृष्टांत असे... डोळे, नाक, कान अनेक अवयव दिसले, तरी ते एकाच शरीराचे भाग असतात किंवा अनेक शाखा दिसल्या तरी तो एकाच झाडाचा विस्तार असतो. अनेक किरणे दिसली, तरी ती एकाच सूर्याची असतात. या सर्व उदाहरणांत, त्या त्या अवयवाचे, शाखेचे, किरणाचे ‘पृथकपण’/‘वेगळेपण’ दिसत नाही. तसे विचारात घेण्याची गरज नसते, तर त्यामागील ‘समग्रपणाचाच’ विचार आवश्यक असतो. 

माउली म्हणतात,

पै कल्लोळाते कल्लोळे । ग्रसिजत असे ऐसे कळे ।
परि ग्रसिते ग्रासावेगळे । असे काई ।।

आपण समुद्राच्या काठावर लाटांचा खेळ पाहत असतो. लहान लहान लाटांच्या मागून एक प्रचंड मोठी लाट येते आणि सगळ्या लहान लाटांना क्षणात गिळून टाकते. नाहीसे करते. याचा अर्थ, ‘नाहीशी झालेली’ छोटी लाट आणि ‘नाहीसे करणारी’ मोठी लाट परस्परांहून वेगळ्या होत्या का? ते तर निखळ पाणीच होते. मोठी लाट निर्माण झाल्याने समुद्रात पाणी वाढले नाही आणि छोटी लाट नष्ट झाल्याने समुद्रातले पाणी कमीही झाले नाही. मुळात पाणी होते, ते तसेच समग्रपणे भरून राहिले आहे. ब्रह्म तसं आहे... समग्र, सर्वव्यापी!

‘ब्रह्म’ म्हणजे काय हे अर्जुनाला कळावं यासाठी कृष्ण आतुर झालाय... आणि अन्वय-व्यतिरेक यांच्या आधारे दिलेल्या अगणित दृष्टांतांतून ते आपल्याला उमगावं म्हणून माउली व्याकुळ झाल्यात. 

ब्रह्म केव्हा कळेल तेव्हा कळो... पण त्याला समजून घेण्यासाठी लहानमोठ्या घटामठात विविधतेने भरून राहिलेला विचार म्हणजे ‘व्यतिरेक’ आणि लाटांचे लहानमोठेपण सोडून देऊन समुद्राच्या पाण्याचा समग्रतेचा केलेला विचार म्हणजे ‘अन्वय...’

ब्रह्म जाणण्याच्या त्या प्रक्रियेत त्या ब्रह्माचा ‘नाही-पणाने’ केलेला विचार म्हणजे ‘व्यतिरेक’ आणि ‘आहे-पणाने’ केलेला विचार म्हणजे ‘अन्वय...’ 

हे इतकंच आज कळलं... 

आज इतकंच समाधान!

- डॉ. अपर्णा बेडेकर 
(संतसाहित्याच्या अभ्यासक)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HULXCV
Similar Posts
पूर्वतयारी... अमृतकण वेचण्याची ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे....’ हा गीतेचा पहिला श्लोक येण्यापूर्वी ज्ञानेश्वरीत माउलींच्या ८४ ओव्या सांगून झालेल्या असतात. परीक्षेला जाण्यापूर्वी आई बाळाकडून उजळणी करून घेते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या पंक्तीला नेण्यासाठी माउली जणू आपली पूर्वतयारी करून घेतात...
दीपे दीप लाविला... श्रीकृष्णाच्या अमोघ वाणीचा आणि अर्जुनाच्या अपूर्व बुद्धीचा मनोज्ञ संगम गीता-उपदेशाच्या रूपाने घडून आला होता. परंतु माउली म्हणतात, त्या आत्मवस्तूपर्यंत पोहोचण्यास वाणीही अपुरी पडते आणि बुद्धीचाही शिरकाव न झाल्याने तीही असमर्थ ठरते. म्हणूनच ती आत्मवस्तू देण्याकरिता भगवंतांनी आता आलिंगनाचे निमित्त केले
वक्तृत्वाचे वऱ्हाडी... वक्तृत्वाचे वऱ्हाडी... माऊलींचा शब्दच किती प्रेमाचा.. कृष्णाची वाणी आणि अर्जुनाची जिज्ञासा यांची सोयरीक सांगणारा... अर्जुनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे ही माझ्या वाणीची जणू प्रेमाची बांधिलकी आहे असं नकळत सूचित करणारा... कृष्णार्जुनाचं नातं अधिकच गहिरं करणारा...
विश्व ब्रह्मचि ठेले आपल्याला द्वंद्वातीत नाही होता आलं, तरी आपापल्या आयुष्यातली द्वंद्वं ओळखून निदान त्या द्वंद्वांची तीव्रता तरी कमी करता यायला हवी. यशाचा माज नको आणि अपयशाने खचून जाणं नको. सुखाला अनंत काळासाठी कवटाळणं नको आणि दुःखाला टाळणं नको. अपयशाला पचवता यावं आणि दुःखाला भिडता यावं. श्रीमंतीतला अवास्तव अभिनिवेष टाळता

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language